Gopinath Munde Shetkari Apghat Anudan Yojana : मंडळी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची योजना आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात अपघातांची शक्यता ही कायमच असते मग तो रस्त्यावरील अपघात असो, विज पडणे, सर्पदंश किंवा अन्य कोणताही दुर्दैवी प्रकार. या योजनेचा उद्देश अशा अनपेक्षित घटनांमुळे शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करून थोडा दिलासा देण्याचा आहे.
कोण पात्र आहे?
ही योजना राज्यातील सर्व वहीतीधारक खातेदार शेतकऱ्यांसाठी खुली आहे. त्यांच्याबरोबरच त्यांच्या कुटुंबातील एक सदस्यालाही या योजनेचा लाभ मिळू शकतो. तो सदस्य अर्थातच वहीतीवर नोंदलेला नसला तरी चालतो.
हा सदस्य कोण असू शकतो? आई, वडील, पती, पत्नी, मुलगा किंवा अविवाहित मुलगी – यांपैकी कोणतीही एक व्यक्ती.
एकूण मिळून दोन व्यक्तींना विमा संरक्षण दिले जाते एक शेतकरी स्वतः आणि दुसरा त्याच्या कुटुंबातील सदस्य. मात्र हे लक्षात ठेवा की या योजनेत सहभागी होणाऱ्यांचे वय किमान १० वर्षे आणि कमाल ७५ वर्षे असणे आवश्यक आहे.
कोणते अपघात विमा संरक्षणात येतात?
या योजनेअंतर्गत काही विशिष्ट अपघातांचा समावेश आहे. यामध्ये रस्ता किंवा रेल्वे अपघात, विज पडणे, विजेचा धक्का, विषबाधा, सर्पदंश, उंचावरून पडणे, नक्षलवादी हल्ला किंवा खून यांचा समावेश आहे. तसेच जनावरांच्या हल्ल्यामुळे झालेला मृत्यू किंवा दंगलसदृश परिस्थितीत घडलेली अपघाती घटना देखील यामध्ये समाविष्ट आहे.
अपघात झाल्यास किती आर्थिक मदत मिळते?
जर अपघातामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाला, किंवा त्याचे दोन्ही डोळे अथवा दोन्ही हात/पाय निकामी झाले, तर शासनाकडून दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाते. एक डोळा आणि एक हात/पाय निकामी झाल्यास देखील हीच रक्कम मिळते. परंतु केवळ एक डोळा किंवा एकच हात/पाय निकामी झाल्यास एक लाख रुपयांची मदत मिळते.
या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास काय करावे?
जर तुमच्या कुटुंबात किंवा ओळखीत एखादा शेतकरी अशा अपघाताला बळी पडला असेल, तर या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी त्वरित संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी सरकारच्या https://sjsa.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊ शकता.
त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्रांची माहिती मिळवा आणि विहित नमुन्यात अर्ज सादर करा. अपघातानंतर शक्य तितक्या लवकर अर्ज केल्यास मदत मिळण्याची प्रक्रिया सुलभ होते.



















