Sugarcane Workers Scheme : मित्रांनो महाराष्ट्र सरकारने ऊसतोड कामगारांसाठी एक नवी योजना जाहीर केली आहे. ऊसतोड कामगार योजना 2025 या नावाने ओळखली जाणारी ही योजना ऊसतोड कामगारांना आर्थिक सुरक्षा आणि ओळख देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत कामगारांना ओळखपत्र (कामगार कार्ड) दिलं जाईल आणि विविध अपघाती घटनांमध्ये त्यांना आर्थिक मदत मिळणार आहे. ही योजना लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळामार्फत राबवली जाणार आहे.
राज्यातील ऊसतोड कामगारांची स्थिती
सध्या महाराष्ट्र राज्यात १२ लाखांहून अधिक ऊसतोड कामगार कार्यरत आहेत. त्यांच्या नोंदणीची प्रक्रिया लवकरच सुरु होणार असून त्यानंतर कामगार कार्डचे वितरण करण्यात येईल.
योजनेचा लाभ कोणत्या जिल्ह्यांना?
ही योजना प्रामुख्याने मराठवाडा विभागातील ऊसतोड कामगारांसाठी उपयुक्त ठरणार आहे. बीड, नांदेड, लातूर, जालना, अहमदनगर, परभणी, धाराशिव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या जिल्ह्यांतील कामगारांना याचा विशेष लाभ होणार आहे.
कामगार ओळखपत्र म्हणजे काय?
ऊसतोड कामगार ओळखपत्र म्हणजे कामगारांचा अधिकृत ओळख दस्तावेज असणार आहे, जो बांधकाम कामगारांच्या ओळखपत्रासारखा असेल. हे कार्ड प्राप्त झाल्यावर कामगारांना विविध सरकारी योजनांचा थेट लाभ मिळू शकतो. शासनाने या कार्डासाठी एजन्सीची नेमणूक केली असून एका कार्डासाठी १७५ रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.
योजनेअंतर्गत मिळणारे लाभ
या योजनेअंतर्गत कामगारांना विविध परिस्थितींमध्ये खालील प्रकारचे अनुदान दिले जाईल. अपघाती मृत्यू झाल्यास कामगाराच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांपर्यंत सानुग्रह मदत दिली जाईल. अपघातामुळे अपंगत्व आल्यास अडीच लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळेल. झोपडीत आग लागल्यास दहा हजार रुपयांची मदत दिली जाईल. वैद्यकीय उपचारांसाठी पन्नास हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळू शकते. तसेच, बैलजोडीच्या अपघातामध्ये लहान बैलासाठी पंचाहत्तर हजार आणि मोठ्या बैलासाठी एक लाख रुपयांची मदत देण्यात येईल.
योजनेच्या अटी व मर्यादा
या योजनेचा लाभ फक्त गाळप हंगामात घडलेल्या घटनांसाठीच लागू होतो. नैसर्गिक मृत्यू, आत्महत्या, दारू किंवा अमली पदार्थांच्या सेवनामुळे झालेला अपघात यावर कोणताही लाभ मिळणार नाही. तसेच, याआधी इतर सरकारी अपघात योजनांचा लाभ घेतलेल्यांना या योजनेतून वगळण्यात येईल.
कोणते अपघात लाभासाठी ग्राह्य धरले जातील?
रस्ता किंवा रेल्वे अपघात, विजेचा धक्का लागणे किंवा वीज पडणे, औषध फवारणी करताना विषबाधा होणे, जनावरांचा हल्ला, साप किंवा विंचू चावणे, पाण्यात बुडून मृत्यू, तसेच बाळंतपणातील मृत्यू अशा घटनांना या योजनेत लाभार्थ मानले जाईल.
लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
योजनेचा लाभ घेण्यासाठी ऊसतोड कामगार ओळखपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, वारसदाराचे प्रमाणपत्र, वयाचा दाखला, स्थळ पंचनामा, नुकसान झाल्याचे छायाचित्र ही कागदपत्रे आवश्यक असतील. लाभ फक्त पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील, सून किंवा इतर कायदेशीर वारसदार यांनाच मिळू शकतो.
ऊसतोड कामगार योजना 2025 ही ऊसतोड कामगारांच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. जर आपण ऊसतोड कामगार असाल, तर आपल्या कुटुंबाच्या हितासाठी नोंदणी प्रक्रिया लवकर पूर्ण करून ओळखपत्र मिळवणे आवश्यक आहे. या योजनेद्वारे आपण पाच लाखांपर्यंतचे लाभ सहज मिळवू शकता.

















