गांधीनगर:- गुजरातमधील काँग्रेसचे विधिमंडळ सदस्य सी. जे. चावडा यांनी आज पक्ष सदस्यत्व तसेच आमदारकीचा राजीनामा दिला. श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासंदर्भात नेतृत्वाच्या भूमिकेवर नाराज असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. चावडा यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने आमदारांची संख्या १५ वर आली आहे. काँग्रेसकडून तीनवेळा आमदार राहिलेले चावडा यांनी शुक्रवारी विधानसभे अध्यक्ष शंकर चौधरी यांच्याकडे राजीनामा सोपविला. यानंतर त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. मी २४ वर्षे काँग्रेसमध्ये घालवली. परंतु, पक्षाच्या श्रीराम मंदिर सोहळ्याबाबतच्या निर्णयाने निराश झालो. संपूर्ण देश प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे उत्साहित असताना त्यात सहभागी न होता पक्षाने नकारात्मक भूमिका घेतली. आता सर्वांनी गुजरातमधील दोन महत्त्वाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या विचारांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन चावडा यांनी यानिमित्ताने केले. काँग्रेसबाहेर पडल्यानंतर चावडा भाजपात दाखल होणार असल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.