आमदार अपात्रतेचा आज निकाल, ऐतिहासिक निर्णयाची प्रतीक्षा, महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले

वृतसंस्था

मुंबई : राज्याच्या राजकारणात उलथापालथ घडवणाऱ्या शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल अखेर आज बुधवारी लागणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हा निकाल देणार आहेत. शिवसेना ठाकरे गट की शिंदे गट यातील कोणाचे आमदार अपात्र ठरणार, की काही वेगळा निकाल लागणार याची उत्सुकता आहे.
निकाल लागण्याच्या पूर्वसंध्येला राज्यातील राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे. विधिमंडळ सचिवालयाकडून निकालाची प्रत अंतिम करण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी रात्री तातडीची बैठक बोलावण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याच्या नव्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला या वर्षा निवासस्थानी दाखल झाले.निकाल असल्याने मुंबईसह राज्यभरातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.

Leave a Comment