अवैध गुटख्याची वाहतूक करणारी कार हरसोडा फाट्यावर पकडली, 7 लाख 29 हजारांचा मुद्देमाल जप्त, एमआयडीसी पोलिसांची कारवाई

मलकापूर :- मिळालेल्या गुप्त माहितीवरून मलकापूर (दसरखेड) एमआयडीसी पोलिसांनी हरसोडा फाट्यावर अवैध गुटखा घेऊन जाणाऱ्या गाडीसह ७ लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ७ फेब्रुवारीला रात्री १.३० सुमारास ही धडक कारवाई करण्यात आली. एमआयडीसी पोलीस मध्यरात्रीनंतर पेट्रोलिंग करत असताना त्यांना पांढऱ्या रंगाची मारोती स्वीप्ट (एमएच ४३ – एएफ ९ ८०२) अवैधरित्या गुटखा भरून कुऱ्हा गावाकडून धुपेश्वर मार्गे हरसोडा रोडने जाणार आहे, अशी माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी तत्काळ हरसोडा फाटा येथे सापळा लावला. रात्री १.४५ वाजताच्या सुमारास मारोती स्वीप्ट वेगाने धुपेश्वर रोडकडून हरसोडा रोडने येतांना दिसले. वाहनाला हरसोडा फाट्यावर प्राथमिक शाळेजवळ थांबवले.

वाहनात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल पान मसालाचा माल असल्याने वाहन चालकास ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीकरिता एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणले. पंचांना बोलावुन पंचासमक्ष व नमूद वाहन चालक व एका व्यक्तीसमोर वाहनाची पाहणी करण्यात आली. कारवाईत मारोती स्वीप्ट (किंमत ५ लाख रुपये) आणि २ लाख २९ हजार ८८० रुपयांचा गुटखा असा एकूण ७ लाख २९ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग कर्ता वसावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन आरोपींविरुद्ध कलम ३२८, २७२,२७३ १८८ भादंविसह अन्न सुरक्षा व मानक कायदा २००६ च्या विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार हेमराज कोळी करत आहेत.

Leave a Comment