नवरा-बायकोत वाद, बापानेच केले लेकीचे अपहरण

अमरावती : पाळणाघरातून तीन वर्षीय चिमुकलीचे तिच्याच वडिलांनी अपहरण केल्याची तक्रार संचालक महिलेने फ्रेजरपुरा पोलिसांत नोंदविली. २५ जानेवारी रोजी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी, पोलिसांनी २६ जानेवारी रोजी उशिरा रात्री अपहृत मुलीच्या वडिलांसह अन्य एकाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

फिर्यादी महिला या आठ वर्षांपासून फ्रेजरपुरा हद्दीत पाळणाघर चालवितात. तेथे अनेक पालक त्यांच्या लहानग्या पाल्यांना तेथे सकाळी ९:३० ते सायंकाळी सात या कालावधीत सांभाळण्याकरिता सोडून जातात. ज्या चिमुकलीचे अपहरण झाले, ती तीनवर्षीय मुलगीदेखील दीड वर्षापासून त्या पाळणाघरात येत होती. त्या चिमुकलीच्या आईच्या गत सांगण्याप्रमाणे त्यांचे व त्यांच्या पतीचे न्यायालयात कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकरण सुरू आहे.
न्यायालयाने मुलीचा ताबा आईकडे दिला आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या मुलीला चांगले सांभाळा, तिला तिच्या वडिलांकडे देऊ नका, असे त्या चिमुकलीच्या आईने आपल्याला सांगितले होते, असे पाळणाघर चालक महिलेने जबाबात म्हटले आहे.

Leave a Comment