मलकापूर : येथील बहुचर्चित कापूस खरेदी करून फसवणूक केल्याप्रकरणी मुख्य आरोपी जग्गू डॉन व त्याच्या साथीदाराच्या पोलिस कोठडीत एक दिवसाची वाढ करण्याचा आदेश मलकापूर न्यायालयाने मंगळवारी दिला. सहा दिवसांत तक्रार नोंदविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या २५० पेक्षा अधिक झाली. त्यातून कोट्यवधींची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. तालुक्यातील मौजे कुंड बु, येथील शेतकऱ्याचा २० लाखांचा कापूस खरेदी करून फसवणूक केल्याप्रकरणी ३० नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल झाली होती. त्यात पोलिसांनी आधी दोघांना व २० डिसेंबर रोजी मुख्य आरोपी जगन रामचंद्र नारखेडे ऊर्फ जग्गू व त्याचा साथीदार पृथ्वीराज तायडे अशा दोघांना मध्य प्रदेशात जेरबंद केले. न्यायालयाने जग्गू डॉन व त्याच्या साथीदारास आठ दिवसांची मग सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यात मंगळवारी एक दिवसाची वाढ झाली. गुन्ह्याची व्याप्ती वाढल्याने या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे हस्तांतरित करण्यात आला. तत्पूर्वी, मलकापूर पोलिस व शेतकरी संघर्ष समितीच्या बैठकीत करण्यात आलेल्या आवाहनानुसार, तब्बल ९५ शेतक-यांनी तक्रारी नोंदवल्या होत्या. त्यात ७५ दलालांनी सुमारे २८ कोटींची रक्कम उचलल्याचे उघडकीस आले होते.