मलकापूर : शैक्षणीक सहली हा शिक्षण प्रक्रियेचा एक आवश्यक भाग आहे. ते वर्गातील शिक्षण वाढवतात, सामाजिक आणि भावनिक विकासाला चालना देतात आणि विद्यार्थ्यांना वास्तविक जीवनातील परिस्थितींशी परिचित करतात. शैक्षणिक सहलीमधून विद्यार्थ्यांना वेगळ्या वातावरणात शिकण्याची आणि नवीन कौशल्ये आणि आवडी विकसित करण्याची अनोखी संधी देतात. त्यामुळे शैक्षणीक सहलीतुन ह्याची अनुभूती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी स्थानिक ली. भो. चांडक विद्यालयाने एकदिवसीय शैक्षणीक सहलीचे आयोजन केले होते. सहलीमध्ये ३८ विद्यार्थ्यांसह पाच शिक्षकानी सहभाग नोंदविला होता. दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्यावर जपलेल्या ऐतिहासिक पाऊल खुणा विद्यार्थ्यांनी न्याहाळल्यानंतर वेरूळ येथील लेणीतील उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना पाहून सर्वविद्यार्थी मंत्रमुग्ध झाले. तसेच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले घृष्णेश्वर येथील मंदिरात महादेवाचे व पुढे खुलताबादच्या भद्रा मारुतीचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. विद्यार्थ्यांनी या शैक्षणीक सहलीत आनंद तर लुटलाच त्याचबरोबर भौगोलिक, ऐतिहासिक, धार्मिक ज्ञानही संपादन केले. प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांनी गीत गायनचा तसेच सहभोजनाचा सुद्धा आस्वाद विद्यार्थ्यांनी घेतला.