तरुणीला गरोदर करून म्हणाला ‘तो मी नव्हेच’! अतिप्रसंग, गर्भपात : दुसरीशीच संधान

अमरावती : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर वारंवार अतिप्रसंग करण्यात आला. त्यातून ती गर्भवती झाली. त्यानंतरही त्याने ‘तो मी नव्हेच’ चा पवित्रा कायम ठेवला. गर्भधारणेनंतर त्याने मी लग्न करणार नाही म्हणजे नाहीच, असे तिला बजावले. लग्नास थेट नकार देऊन त्याने दुसऱ्याच मुलीशी लग्न जोडले. त्यामुळे ती आजारी पडून तिचा गर्भपात झाला. २० जानेवारी पूर्वी ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी २७ जानेवारी रोजी दुपारी ४:३० च्या सुमारास आरोपी मुन्ना तन्ने खाँ (२८, रा. आझादनगर) याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

फिर्यादी व आरोपी यांच्यात परस्पर ओळख होती. पाच वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध देखील होते. सन २०२२ च्या सुमारास आरोपी मुन्ना खाँ याने तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवले. आपण लग्न करणारच आहोत, अशा भूलथापा तिला दिल्या. त्यामुळे फिर्यादी तरुणी ही सन २०२३ मध्ये गर्भवती राहिली. आपण गर्भवती असल्याची बाब तिने
आरोपीस सांगितली. मात्र, त्यानंतरही त्याने लग्नास नकार दिला. त्यामुळे ती हवालदिल झाली. तिला सामाजिक बदनामीची भीतीदेखील वाटली. त्यामुळे तिने त्याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला. प्रेयसी गर्भवती असतानादेखील आरोपीने दुसऱ्या मुलीशी लग्न जोडले. त्यामुळे ती चिंताग्रस्त झाली. ती बाब तिने आईला सांगितली. काळजीपोटी तिची प्रकृती बिघडली. तिला तिच्या आईने रुग्णालयात नेले असता तेथे तिचा गर्भपात झाला. गर्भपाताची बाब देखील पीडित, तरुणीने त्याला सांगितली. त्यावर लग्नास नकार देत उलटपक्षी पोलिस ठाण्यात तक्रार केल्यास मी तुला पाहून घेईन, अशी धमकी तिला दिली. त्यामुळे पीडितेने २७ जानेवारीला पोलीस ठाणे गाठले.

Leave a Comment