शेतातील झोपडीत दडवले चाकू सुरी, कोयते, गुप्ती! पोलिसांनी केली कारवाई

अमरावती : अचलपुरातील सरमसपुरायेथील एका शेतातील झोपडीत दडवून ठेवलेला शस्त्रसाठा स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला. ८ फेब्रुवारी रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत चाकू, भाला, दोन कोयते व एक गुप्ती ही शस्त्रे हस्तगत करण्यात आली. तेथून सुबान खाँ मोहम्मद खाँ (रा. मेहराबपुरा, अचलपूर) याला अटक करण्यात आली.

अचलपुरातील नवबाग शेतशिवारातील शेतामध्ये असणाऱ्या झोपडीत एकाने अवैधरित्या विनापरवाना धारदार चाकू, सुरे, भाले लपवून ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्याआधारे, पोलिसांनी सुबान खाँ मोहम्मद खॉ याच्या शेतातील झोपडीवर जाऊन पाहणी केली असता तेथे सुबान खॉ हादेखील मिळून आला. त्यास ताब्यात घेऊन त्या झोपडीची पाहणी केली असता तेथे शस्त्रे मिळून आली. आरोपीस शस्त्रे बाळगण्याचा उद्देश व परवान्याबाबत विचारणा केली असता त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली तथा आपल्याकडे कोणताही परवाना नसल्याचे त्याने सांगितले. त्याच्याविरुद्ध सरमसपुरा पोलिस ठाण्यात शस्त्र अधिनियमाअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Comment