बकऱ्या चारत असलेल्या महिलेला दुचाकीची जबर धडक, अपघातात 60 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू!

अकोला खुर्द- जळगाव जामोद तालुक्यातील अकोला खुर्द खांडवी रोडवर दुचाकीने दिलेल्या धडकेत अकोला खुर्द येथील इंदुबाई पुंजाजी हेलोडे (६०) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ९ फेब्रुवारी रोजी घडली.

प्राप्त माहितीनुसार अकोला खुर्द- खांडवी रोडवर गावालगत इंदुबाई बकऱ्या चारत होत्या. दरम्यान, खांडवीवरून भेंडवळकडे भरधाव जात असताना अकोला खुर्द गावाजवळ त्यांना विना क्रमांकाच्या दुचाकीने उडवले. या अपघातात इंदुबाई पुंजाजी हेलोडे यांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीचालक संतोष पालीवाल यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संतोष पालीवाल याच्याविरुद्ध भादंविच्या कलम २७९, ४०३ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला.
या अपघात प्रकरणाचा तपास जळगाव जामोद पोलिस स्स्टेशनचे पोलिस निरीक्षक महाजन यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. जळगाव जामोद तालुक्यातील अकोला खुर्द खांडवी रोडवर वाहनचालक वाहने सुसाट चालवतात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याकडे पोलिसांनी लक्ष देवून रस्त्यावर गतीरोधक बांधण्याची मागणी तालुक्यातील वाहन चालकांनी केली आहे. रस्त्यांचीही दुरवस्था झाल्याचे चित्र आहे.

Leave a Comment